व्यवसायासाठी कर्जाचे प्रमाण - किती योग्य? कधी हानिकारक?

JSB Blog-2    02-Dec-2016
|



Business Load

व्यवसायासाठी किती प्रमाणात कर्ज घ्यावे हा छोट्या व मध्यम व्यवसायिकांसमोरचा एक कायमचा प्रश्न. कधी पैशांची गरज असताना बँक किंवा वित्तीय संस्था भरपूर अटी लावतात तर कधी पैसे लागत नसताना एखादी नवीन आणि उत्साही लोन स्कीम आलेली असते. क्वचितच, हवे तेव्हा, हवे तेवढे आणि हव्या त्या व्याजदरावर पैसे उपलब्ध होतात. अशा परिस्थितीत, बरेचदा जास्त किंवा कमी कर्ज घेऊन व्यावसायिक अडचणीत येतात. 

व्यवसायासाठी घ्यायच्या कर्जाचे योग्य प्रमाण ठरवण्याचा तसा एखादा नेमका formula नसला तरी ढोबळ मानाने, खालील २-३ मुद्दे लक्षात घेतल्यास यातल्या चुका कमी केल्या जाऊ शकतात.

 

कर्ज - जितक कमी तितक चांगलं 

आत्ता मिळत आहेत म्हणून, आणि कदाचित नंतर मिळणार नाही म्हणून, एकाच वेळी जास्तीत जास्त कर्ज घेऊन ठेवणं हि वृत्ती विशेषतः छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात आढळते. काही अंशी कर्ज देणाऱ्या संस्था देखील अनेक वेळा कृत्रीम भीती तयार करून, व्यावसायिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त लोन घ्यायला भरीस पाडतात. पण दीर्घकाळामध्ये व्यवसायाच नाही तर कर्ज देणारी संस्था देखील ह्या वृत्तीमुळे नुकसानच सोसते. त्यामुळे कमीत कमी, अगदी आपल्या गरजेपुरतच कर्ज घेणे हे सगळ्यात योग्य. व्यवसायासाठी आवश्यक असलेले पैसे नेमके कधी आणि किती प्रमाणात लागणार आहेत याचे नियोजन स्पष्ट असेल, तर कर्जाचे योग्य प्रमाण ठरवण्यास मदत होते. 

 

कर्जाचे योग्य प्रमाण ठरवताना...काय बघाल?

कर्ज घेताना सगळ्यात महत्वाची आणि म्हणूनच कायम लक्षात ठेवण्याची बाजू म्हणजे ते परत करण्याची असलेली व्यवसायाची क्षमता. बरेचदा कर्ज घेताना केवळ दीर्घकाळामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा विचार केला जातो. पण नजीकच्या काळात भरावे लागणारे कर्जाचे हप्ते सोयीस्कररीत्या विसरले जातात. एखाद्या व्यवसायाची कर्ज परत करण्याची क्षमता हि त्या व्यवसायातील cash - flow मुळे ठरते. त्यामुळे कर्ज घेताना व्यवसायामध्ये उत्पन्न होणार ज्यादा cash - flow लक्षात घेऊन, त्या प्रमाणे नियोजन करणे सगळ्यात योग्य. cash - flow  आणि कर्जाचा हप्ते ह्यातील प्रमाण चुकले कि अडचणींची सुरवात झालीच म्हणून समजा.  

 

प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज उचलताय - पुन्हा विचार करा!

प्रॉपर्टी गहाण ठेवून व्यवसायासाठी कर्ज मिळवणे अतिशय सोपे असले तरी तसे करणे व्यवसायाच्या दृष्टीतून योग्य असेलच असे नाही. प्रॉपर्टी वर मिळणारी रक्कम हि व्यवसायातील cash - flow  च्या प्रमाणात तपासून मगच व्यवसायाच्या लोनची योग्यता ठरवावी. व्यवसायामधल्या संधी आणि संभाव्य धोके हे योग्य प्रमाणात समजून घेऊन त्यानंतरच आवश्यक असलेल्या कर्जाची रचना करावी. महत्वाच म्हणजे व्यवसायातील cash - flow ला अनुसरून घेतलेल लोन हे प्रॉपर्टीच्या तुलनेत घेतलेल्या लोन पेक्षा कधीही हितकारक.