विशिंग अटॅक

10 Feb 2020 18:00:43

Vishing Attack _1 &n
 
आपण एखादी कायदेशीर व्यक्ती असल्याचे भासवून, एखाद्या तोतया व्यक्तीकडून सर्वसामान्य माणसाची फसवणूक करणे ही नवीन गोष्ट नाही. जुन्याच पद्धतींना थोडेसे वेगळे वळण देऊन मोबाईलच्या मदतीने करण्यात येणारा हा गुन्हा आहे. ‘विशिंग’ हा शब्द ‘आवाज’ आणि ‘फिशिंग’ यांचे संयोजन आहे. फिशिंग आपल्याला वैयक्तिक, संवेदनशील किंवा गोपनीय माहिती उघड करण्यासाठी फसवणूकीचा उपयोग करण्याची सायबर गुन्ह्यातील एक पद्धत आहे... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘विशिंग अटॅक’ याविषयी माहिती देणारा हा दहावा लेख...
.........................................................................
 
तोतया व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीला घाबरवण्याचे डावपेच वापरून किंवा भावनिक गोष्टींचा वापर करून वैयक्तिक माहिती देण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतात. तोतया व्यक्ती या बनावट कॉलर आयडी प्रोफाइल देखील तयार करतात (ज्याला कॉलर आयडी स्पूफिंग म्हणतात) त्यांचे फोन नंबर कायदेशीर वाटतात. 
 
कसा केला जातो विशिंग अटॅक..? 
 
१. एखाद्या व्यक्तीला फोन करून तोतया व्यक्ती आपण आणि आपला संपर्क क्रमांक कायदेशीर असल्याचे भासवून, आपण केलेला फोन हा कायदेशीर आहे, यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात. 
 
२. आपल्या बँक खात्याच्या, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या खाते/कार्ड संदर्भातील पासवर्ड किंवा पिन बदलण्यासाठी आम्ही देत असलेल्या क्रमांकावर कॉल करा, असे तोतया व्यक्तीकडून सांगण्यात येते. सामान्यतः तोतया व्यक्तीकडून पाठविण्यात आलेल्या फोन क्रमांकावर कॉल केल्यानंतर आपल्याला स्वयंचलित रेकॉर्डिंग ऐकू येते. स्वयंचलित रेकॉर्डिंगद्वारे आपणास खाते क्रमांक, डेबिट/क्रेडीट कार्ड क्रमांक, कार्डमागील सीव्हीव्ही, कार्डची मुदत संपण्याचा महिना व वर्ष, जन्म दिनांक इत्यादी माहिती विचारली जाते. सदर माहितीमध्ये कुठेही अक्षरांचा उल्लेख नसल्याने मोबाईल/ फोनद्वारे आवश्यक माहिती नंबरद्वारे गोळा केली जाते.
 
३. तोतया व्यक्तीकडून फोन करून आपण इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे भासवले जाते. फोन केलेल्या व्यक्तीस आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीची इन्श्युरन्स पॉलिसीची मुदत संपली असून आपण त्या पॉलिसीचे नामनिर्देशित व्यक्ती आहात व पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी आपणास काही कागदपत्रांची पूर्तता करणे व प्रशासकीय शुल्कापोटी काही रक्कम भरणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते. 
 
उपरोक्त उल्लेखित उदाहरणांप्रमाणे अन्यही अनेक कारणांसाठी तोतया व्यक्तींकडून फोन केले जातात व सर्वसामान्य व्यक्तींची फसवणूक केली जाते.
 
काय काळजी घ्याल..?
 
१. कोणतीही बँक अथवा बँकेचे कर्मचारी फोन करून कोणत्याही व्यक्तीच्या खाते/कार्ड इत्यादी संदर्भातील माहिती विचारत नाहीत. तेव्हा ही माहिती कोणालाही देऊ नये. 
२. कोणतीही बँक अथवा बँकेचे कर्मचारी आपले डेबिट/क्रेडीट कार्ड सुरक्षेबाबतची माहिती फोनद्वारे अद्ययावत करण्यास सांगत नाहीत. 
३. जर एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्यासंदर्भातील संवेदनशील/वैयक्तिक माहिती फोनवरून विचारत असेल, तर सदर माहिती कोणाही व्यक्तीला सांगू नका.
४. अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला आपले खाते/कार्डवरील व्यवहार बंद होण्याबाबतची सूचना मिळाल्यास भावनेच्या आहारी जाऊन आपली संवेदनशील माहिती सांगू नका. बँकेच्या शाखेत जाऊन आपल्या शंकेचे निरसन करून घ्या.
५. आपल्याला आलेल्या फोनसंदर्भात कॉलर आयडी जरी आपल्या एखाद्या बँक, कंपनी, संस्था यांचे नाव दर्शवित असेल, तरी कोणतीही संवेदनशील माहिती सांगू नका.
६. गुन्हेगार आपल्या भावनांशी कायम खेळत असतात अशा वेळी डोके शांत ठेवा आणि फोन बंद करा. 
Powered By Sangraha 9.0