मोबाईल रिमोट अॅप वापरून होणारी फसवणूक

Cybercrime Awareness Blog    07-Jan-2020
Total Views |

Mobile Remote App_1  
 
स्क्रीन शेअर, एनी डेस्क, टीम व्ह्युअर इत्यादी शेअरिंग अॅप्स ग्राहकाच्या फोनवर इन्स्टॉल केले, की विक्रेत्याला त्याच्या दुकानात त्या फोनचे सर्व अधिकार प्राप्त होतात व तो तिथूनच त्याची दुरुस्ती करू शकतो. या अॅपचा वापर करून मोबाईल धारकाची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘मोबाईल अॅपद्वारे होणारी फसवणूक’ याविषयी माहिती देणारा हा सातवा लेख...
.....................................................................

सध्या बाजारात अनेक स्क्रीन शेअरिंग अॅप्स (Screen sharing apps) उपलब्ध आहेत. जसे की स्क्रीन शेअर (Screenshare), एनी डेस्क (Any Desk), टीम व्ह्युअर (TeamViewer) इत्यादी. या अॅप्सचा वापर त्या वस्तूची दुरुस्ती दूरवरून करण्यासाठी केला जातो. ग्राहकाच्या फोनवर उपरोक्त उल्लेखित अॅपपैकी एखादे अॅप इन्स्टॉल केले, की विक्रेत्याला त्याच्या दुकानात त्या फोनचे सर्व अधिकार प्राप्त होतात व तो तिथूनच त्याची दुरुस्ती करू शकतो. या अॅपचा वापर करून मोबाईल धारकाची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो.

अशा प्रकारांमुळे काय नुकसान होऊ शकते?

१. फसवणूक करणारी व्यक्ती उपरोक्त उल्लेखित रिमोट अॅपद्वारे मोबाईलचा ताबा घेऊन युजरचा सर्व डाटा म्हणजे फोटोज, फाईल्स, व्हिडीओज अथवा फोनमधील महत्त्वाची माहिती चोरी करून घेऊ शकते.
२. जर मोबाईलवर तुमचे मेल अकाउंट समाविष्ट केलेले असेल, तर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला रिमोट अॅपद्वारे तुमच्या मेलबॉक्सचाही ताबा मिळू शकतो.
३. येणाऱ्या मेलप्रमाणेच मोबाईलवर येणाऱ्या संदेशांचाही (SMS) ताबा मिळू शकतो, ज्यामुळे या मेसेजेसमध्ये असलेले आवश्यक ओटीपी (OTP), बँक व्यवहाराची माहिती, बँक खात्यातील शिल्लक रक्कम माहिती इ. सर्व माहिती फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला सहजगत्या मिळू शकते.
४. फसवणूक करणारी व्यक्ती मोबाईलवर इन्स्टॉल केलेल्या बँकिंग अप्लीकेशनचा ताबा मिळवू शकते, जसे की गूगल पे (Google pay), भीम अॅप (Bhim App), फोन पे अॅप (Phone pay), तेज अॅप (Tez) इत्यादी. रिमोट अॅपद्वारे मोबाईलमधील असलेल्या उपरोक्त उल्लेखित अॅपचा वापर करून फसवणूक करणारी व्यक्ती तुमच्या बँक खात्यातील उपलब्ध रक्कम अन्यत्र वर्ग करू शकते, ऑनलाइन खरेदी करू शकते किंवा तुमच्या मिळालेल्या व्यक्तिगत/खाजगी माहितीचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते.

कशा प्रकारे ही फसवणूक होऊ शकते?

१. फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला फोन करून दुरुस्तीसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या कामासाठी एखादे रिमोट अॅक्सेस मिळवून देणारे अॅप इन्स्टॉल करायला भाग पाडते. कधी कधी आपण एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या चुकीच्या लिंकवर क्लिक करून हे अॅप इन्स्टॉल करतो. तर कधी बँक अधिकारी असल्याचे भासवून फोन केला जातो व अॅप इन्स्टॉल करायला सांगितले जाते.
२. अॅप इन्स्टॉल झाल्यावर अॅपद्वारे एक नऊ अंकी नंबर पाठविला जातो, जो फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला फोनवर शेअर करायला सांगितला जातो अथवा एसएमएसने पाठविण्यासाठी सांगितले जाते.
३. या नंबरच्या आधारे फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला एक रिक्वेस्ट पाठविते आणि सदर रिक्वेस्ट स्वीकारण्यास सांगते. त्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मोबाईल फोनचे सर्व अधिकार तुमच्या नकळत प्राप्त होतात.
४. तुम्हाला असे वाटत असते, की समोरचा माणूस तुम्हाला मदत करतो आहे आणि त्यात तुमचाच फायदा आहे, म्हणून तुम्ही सर्व गोष्टी ऐकून समोरच्या व्यक्तीला तुमच्या मोबाईल फोनचा ताबा मिळवून देता.
५. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला एकदा तुमच्या मोबाईलचा ताबा मिळाला, की त्याला तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती उपलब्ध होते. तसेच तो दूरवरूनही तुमच्या मोबाईलमधून व्यवहार करू शकतो.
६. कधी कधी तुम्हाला हे माहीतही नसते, की कोणीतरी तुम्ही करत असलेल्या तुमच्या मोबाईलच्या वापरावर दुरून नजर ठेवून आहे.
७. कधी कधी फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला बँक अधिकारी आहे, असे भासवून तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स (Debit/Credit card) फोनसमोर धरायला सांगतात. तुम्हाला त्यात काहीही वावगे वाटत नसल्यामुळे तुम्ही ते करता आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून कार्डची सर्व माहिती फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला मिळते.
८. फसवणूक झाल्यानंतर बहुतांश वेळेस ग्राहकाला असे वाटत असते, की मी कोणीतीही गोपनीय माहिती कुणालाही सांगितलेली नाही अथवा मोबाईल किंवा कार्ड ही कोणाकडे दिलेले नाही. मग आपली फसवणूक कशी झाली. पण तुम्ही इन्स्टॉल केलेल्या अॅपद्वारे दिलेल्या ताब्यामुळे त्याला सर्व माहिती मोबाईलमधून प्राप्त होते.
 
 
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? 
 
१. कोणाच्याही सांगण्यावरून कुठलेही माहीत नसलेले अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करू नये.
२. कोणालाही आपल्या मोबाईलचा रिमोट अॅक्सेस देऊ नये आणि आपल्या नकळत चुकून कोणतेही अॅप इन्स्टॉल झाले, तर त्याद्वारे जनरेट झालेला कोड कोणासही शेअर करू नये.
३. अॅप इन्स्टॉल झाल्यावर जनरेट झालेला कोणताही एसएमएस कोणालाही पाठवू नये.
४. तुमची गोपनीय माहिती जशी कार्डची माहिती, पासवर्ड, वन टाईम पासवर्ड (OTP) शेअर करू नये.
५. एखादे अॅप जर चुकून इन्स्टॉल झाले, तर ते लगेच अनइन्स्टॉल करावे.
६. कुठलेही अॅप इन्स्टॉल करताना ते प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी.
७. मोबाईलला पासवर्ड सेट करावा आणि स्क्रीन लॉकची सुविधा ठेवावी.
८. मोबाईलवर कार्ड संदर्भातील कोणताही डाटा जसे कार्ड नंबर, पिन , सीव्हीव्ही क्रमांक (CVV) अथवा कार्डचा फोटो किंवा इतर महत्त्वाची कागदपत्र (PAN कार्ड , आधार नंबर पासपोर्ट नंबर )जतन करून ठेवू नये.