'सायबर क्रिमिनल'च्या जाळ्यात अडकू नका...

Cybercrime Awareness Blog    11-Nov-2019
Total Views |


 
 
सध्याच्या काळात संगणक, मोबाईल, टॅब्लेट अशा उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उपकरणांचा वापर करण्यासाठी इंटरनेट सुविधेचा वापरही वाढला आहे. त्यामुळे ह्या उपकरणांचा व इंटरनेटचा वापर करून होणाऱ्या गुन्हांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. अशा गुन्ह्यांना सायबर गुन्हे म्हणून ओळखले जातात. सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत आपणास माहिती असणे आवश्यक आहे. त्याला अनुसरून सायबर गुन्हे व घ्यायची काळजी याबाबतची प्राथमिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
स्पीअर फिशिंग
 
सर्व सामान्यपणे आपण फिशिंग हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ मासेमारी अशा अर्थाने वापरतो. सायबर स्पेस किंवा इंटरनेट क्लाउड हा एक अथांग समुद्र आहे आणि ह्या समुद्रातून कोण गळाला लागू शकेल ह्यासाठी सायबर क्रिमीनल जाळं टाकून बसलेला असतो. त्याचा उद्देश गळाला लागलेल्या व्यक्तीच्या ऑनलाईन खात्याची तसेच अन्य माहिती मिळवून फसवणूक करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणे.
स्पीअर फिशिंग ह्या प्रकारात म्हणजे अनेक लोकांना मेल पाठविली जाते. मेल पाठवणारी व्यक्ती आपण वैध व्यक्ती / संस्था असल्याचे भासवते. लक्षित व्यक्तीला पाठवलेली मेल उदा. आयकर भरण्याबाबतची नोटीस, आर.टी.ओ. रजिस्ट्रेशनबाबतची नोटीस, वाहतूक नियम मोडल्याबाबतचा दंड भरण्याची नोटीस अशाप्रकारची असते. मेलचा लेआउट असा असतो की मेल मिळाल्यानंतर काहीवेळा भितीपोटी सदर मेलला प्रतिसाद देते. अशा मेलद्वारे लक्षित व्यक्तीकडून त्याची वैयक्तिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामध्ये लक्षित व्यक्तीकडून त्याचे बँकेतील खाते, डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड संदर्भातील माहिती (कार्ड नंबर, Card Expirty Date, CVV), मोबाईल क्रमांक इ. माहिती मागितली जाते. काहीवेळा लक्षित व्यक्तीला मेलद्वारे लिंक पाठविली जाते आणि त्याचा वापर करून माहिती पाठविण्यास सांगितले जाते किंवा अशाप्रकारची लिंक क्लिक केल्यामुळे लक्षित व्यक्तीच्या संगणकावर मालवेअर इनस्टॉल केला जातो व लक्षित व्यक्तीच्या न कळत संगणकावरील माहिती काढून घेतली जाते.
 

 

काय काळजी घ्यावी :-

१. मेल आल्यानंतर सदर मेल कोणाकडून आली आहे ह्याची खात्री करून घ्यावी.
२. मेल ज्या व्यक्ती / संस्थेकडून पाठवली जाते तेव्हा त्यांचा ई-मेल आयडी सदर मेलमध्ये दिसतो (उदा. <ashish0169@gmail.com>) त्याची खात्री करावी. ई-मेल आयडीची खात्री करताना < > ह्या मध्ये नमूद केलेला ई-मेल कोणता आहे ते पहावे व खात्री करावी. अन्य कोणत्याही हेडिंगवर विश्वास ठेवू नये.
३. अवैध ई-मेल – Head Office ho@abcbank.co.in <info@interglobalshipping.ff> अशा प्रकारचा असू शकतो. उपरोक्त उदाहरणात < - - - - > मध्ये नमूद केलेला ई-मेल आयडी Head Office ho@abcbank.co.in ह्याच्याशी संबंधित नाही परंतु आलेल्या मेलला देण्यात येणारा प्रतिसाद हा Head Office ho@abcbank.co.in हेडिंग वाचून दिला जातो त्यामुळे < - - - - > मध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडीची खात्री करावी.
४. मेलमध्ये दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
५. कोणतीही बँक मेलवरून वैयक्तिक माहिती मागवित नाही त्यामुळे आलेली मेल बँकेकडून असल्याचे भासवले असेल तरीसुद्धा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये.