असा असतो शैक्षणिक कर्जासाठीचा व्याजदर आणि परतफेड

JSB Blog    25-Jun-2016
|

            

 

कर्जाचा व्याजदर किती असतो?
प्रत्येक बँक आपापला व्याजदर ठरवते. पण सर्वसाधारणपणे ते व्यावसायिक व्याजदरापेक्षाकमीच आढळतात. अनेक बँका मुलींसाठी व्याजदरात सवलत देतात. काही बँकांनी शिक्षण संस्था जर नामवंत असेल, व शिक्षणानंतर  नोकरीची हमी असेल, तर व्याजात सूट देऊ केली आहे. काही बँकांनी घर कर्जदारांना शिक्षण कर्ज हवे असेल तर सूट देऊ केली आहे. हे व्याजदर तरत्या स्वरुपात (बदलते) असतात. भविष्यात ते बँकेच्या धोरणाप्रमाणे ते कमी अधिक होऊ शकतात.

व्याज आकारण्याची पध्दत काय असते?
कर्ज वितरण एकरकमी होत नाही. जसजसा पाठ्यक्रम पुढे सरकेल, तसतसा, संस्थेच्या मागणीनुसार थेट संस्थेस कर्ज वितरण केले जाते. संपूर्ण पाठ्यक्रमाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने  कर्ज वितरण होत असल्याने प्रत्येक वेळी जेवढे कर्ज प्रत्यक्ष उचलले गेले आहे, तेवढ्यावरच व्याज आकारले जाते; मंजूर रकमेवर नाही. या पध्दतीमुळे कर्जदारावर व्याजाचा बोजा कमी बसतो.

जोर्यंत विद्यार्थी शिकत आहे, तसो पर्यंत व्याज आकारणी सरळ पध्दतीने असते; चक्रवाढ पध्दतीने नाही.

मासिक व्याज आकारले जाते, पण त्याचा हिशोब स्वतंत्र ठेवला जातो. पालकांनी व्याज भरलेच पाहिजे असा आग्रह नसतो. परंतु हे व्याज वेळीच वसूल व्हावे म्हणून बऱ्याच बँका, या काळात व्याज पालकांनी भरल्यास, व्याज दरात १ % सूट देतात. विद्यार्थ्याचे शिक्षण संपून एक वर्ष झाले की कर्जाची परतफेड सुरु होते. त्यानंतर मात्र मासिक चक्रवाढ सुरु होते.

कर्जाची परतफेड कशी असते?

जो पर्यंत विद्यार्थी शिकतो आहे, तो पर्यंत कर्ज फेडीचा कार्यक्रम नसतो. (पण पालकांनी रक्कम भरली तरी चालते.) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाने (अथवा नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यांनी – यातील जे आधी घडेल तेथपासून) इ.एम.आय [मासिक हप्ते] सुरु होतात. यापुढे कर्ज १० ते १५ वर्षात परत करायचे असते. रु. १० लाखापेक्षा अधिक कर्जाची परतफेड मुदतीपूर्वी केल्यास, काही बँका दंड व्याज आकारतात. ते पालकांना तपासून घेणे गरजेचे आहे.
 

अन्य अटी
एका विद्यार्थ्यास केवळ एकाच बँकेकडून कर्ज घेता येईल. प्रक्रिया शुल्क, दस्तऐवजांचा खर्च, अन्य प्रभार, दंडव्याज या संदर्भात ज्या त्या बँकेकडे अगोदरच चौकशी करावी. कर्ज वाटप टप्प्याटप्प्याने होत असताना प्रत्येक मागणी सोबत विद्यार्थ्याचा प्रगती अहवाल बँक मागते. विद्यार्थी प्रगती करत नसेल तर कर्ज वितरण थांबवले जाऊ शकते. जर काही अपरिहार्य कारणाने शिक्षणात खंड पडला असेल तर त्याचा सहानुभूतीपूर्वक विचारही होऊ शकतो.

जर विद्यार्थ्याने पाठ्यक्रम मधेच सोडून दिला अथवा संस्थेने त्यास काढून टाकले, तर मात्र सर्व कर्ज एक रकमी भरण्याची मागणी होऊ शकते. विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर शिक्षण कर्जाचा, संबधित बँकेचा उल्लेख असेल; यामुळे भविष्यात नोकरी देणारी संस्था कर्जदाराच्या पगारातून मासिक हप्ते कापून घेऊन बँकेकडे पाठवू शकेल.

कर्ज मंजुरीच्या अटी व शर्ती नीट वाचाव्यात; शंका असल्यास त्या दूर करून घ्याव्यात. कर्जमंजुरीची प्रत स्वतःजवळ जपून ठेवावी. भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास तिचा आधार घेता येईल. कर्ज वितरण ते कर्ज समाप्ती या कालावधीत बँकेशी सतत संपर्क ठेवणे लाभदायक ठरते.