डिजिटल सावधगिरी - जागरूकता हीच खरी सुरक्षा

JSB Financial Blog    13-Aug-2025
|

digital Awareness 
 
डिजीटल सुविधांमुळे दररोजचे आयुष्य सोपे आणि सुटसुटीत झाले, आपल्या हातातील मोबाईलवर घरबसल्या व्यवहार करता येणे शक्य झाले मात्र या सगळ्या सुविधांचा वापर करताना सुरक्षितता बाळगणे तेवढेच महत्वाचे आहे. डिजीटल सावधानता न बाळगणाऱ्या, सोशल मिडीयाचा अकारण वापर करणाऱ्यांना लक्ष्य करत सायबर गुन्हेगार फसवणूकीचे प्रकार करतात. यामुळे सामान्यांचे आर्थिक नुकसान होते.
 
असाच एक फसवणूकीचा प्रकार समजून घेऊया -
सायबर चोरटे वेबसाईट असलेल्या व्यावसायिकांना धमकी देण्याचे फोन करतात. तुमच्या वेबसाईटवरील सर्च इंजिन अपडेट करण्याची मागणी केली जाते तसे केले नाहीत तर गुगलच्या सेवा खंडीत होऊ शकणाऱ्या लिस्टमध्ये तुम्हाला टाकले जाऊ शकतात. असा संदेश देणारे फोन कॉल्स, ई-मेल तसेच फेक इनव्हाईससुध्दा तुम्हाला पाठवले जाऊ शकतात. ते टाळण्यासाठी चुकीच्या गुगल लिस्टींग सर्विसेससारखे दिसणारे नाव घेऊन तुमची खात्री पटवली जाऊ शकते.
तेव्हा गुगल किंवा कोणताही ई-मेल सुविधा प्रोव्हायडर आपल्या सेवांसंदर्भात असे फोनवरुन किंवा ई-मेलद्वारे तुम्हाला सुचित करत नाही. सर्च इंजिनसाठीचे लिस्टींग अगदी मोफत असते. ते कोणत्याही प्रकारे शुल्क आकारत नाही.
 
कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्याल
- बँकिंग संदर्भातील कोणतीही माहिती कोणाबरोबरही शेर करु नका
- गुगल किंवा बिंजचे सर्च इंजिन लिस्टिंग मोफत असते
- तुम्हाला येणारा फोन किंवा ई-मेल कोणाकडून आला आहे याची खात्री करुन घ्या. प्रतिसाद देण्यापुर्वी हा कॉल किंवा ई-मेल अधिकृत आहे की नाही याची तपासणी करा.
- कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांआधी अधिकृत वेबसाईट तपासा.
 
तातडीच्या पेमेंट विनंत्या किंवा धमक्यांपासून सावध रहा.
• तुमचा व्यवसाय किंवा बँक तपशील व्यवस्थापित करण्यासाठी सत्यापित ॲप्स आणि वेबसाइट्स वापरा.
• तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबाला सामान्यपणे कोणत्या प्रकारे फसवणूक होते याची माहिती करुन द्या
• कोणत्याही ऑनलाईन फसवणूकीसंदर्भात शंका असल्यास, तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा किंवा विश्वासू आयटी तज्ञाचा सल्ला घ्या.
• अधिकृत वृत्तपत्रे आणि आरबीआय आणि बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचना किंवा सतर्कतेबाबत किंवा घोटाळ्यांबद्दल अपडेट रहा.
शंका असल्यास, आपल्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क करा किंवा एखाद्या तज्ञाची मदत घ्या.
 
सावध राहा, सुरक्षित राहा.
 
मुलांची सुरक्षितता -
शाळेत जाणारी मुले आणि मुलीही मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करतात. केवळ उत्सुकता म्हणून अनेक ॲप्स किंवा वेबसाईट ओपन केल्या जातात. त्या पाहण्यासाठी लागणारी परवानगी नकळतपणे दिली जाते. तेव्हा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. पालकांनी सजगपणे मुलांमध्ये मोकळेपणाने बोलून जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
 
सायबर सुरक्षेबाबत पालकांनी कोणती काळजी घ्यावी
 
तुमच्या मुलांशी ऑनलाइन धोक्यांबद्दल बोला - मुलांना तांत्रिक तसेच खऱ्या आणि खोट्या वेबसाईटची माहिती करुन द्या. जसे की ग्रूमिंग, फसव्या साईटस, गुंडगिरी आणि पाठपुरावा करत फसवणूक करणे, त्यांच्या ऑनलाइन वापरण्यात येणाऱ्या धोक्यांची माहिती करुन देणे आणि मागोवा ठेवणे. इंटरनेट आणि ऑनलाइन गेम वापरण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करा.
 
वर्तनातील बदलाचे संकेत लक्षात घ्या: मुले ऑनलाइन स्क्रिनटाईम जास्त वेळ घालवू लागले तर त्यांच्या वागणूकीत बदल जाणवू लागेल. कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये ते काय बघत आहेत किंवा कोणते गेम्स खेळत आहेत याबाबत बचावात्मक पवित्रा घेत असतील किंवा त्यांच्या हालचाली बद्दल गुप्तता बाळगत असेल, तर ते सायबर ग्रूमिंगचे सूचक असू शकते. तुमच्या मुलांशी बोला आणि त्याला/तिला इतर कामांमध्ये गुंतवा.
 
सायबर ग्रूमिंगपासून तुमच्या मुलाला वाचवा: ग्रूमिंग ही एक अशी पद्धत आहे जिथे कोणीतरी सोशल मीडिया किंवा चॅट विंडोद्वारे मुलाशी भावनिक बंध निर्माण करतो ज्याचा उद्देश लैंगिक शोषणासाठी त्यांचा विश्वास मिळवणे आहे. मुले अधिक मित्र बनवण्यासाठी सोशल मीडियावरील गोपनीयता सेटिंग्ज काढून टाकू शकतात. पालकांनी सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबद्दल चर्चा करावी. तसेच, त्यांनी त्यांना मजबूत गोपनीयता सेटिंग्ज निवडण्यास शिक्षित करावे आणि मदत करावी.
 
संशयास्पद लिंक्स किंवा अटॅचमेंट्सवर कधीही क्लिक करू नका: अज्ञात व्यक्तीकडून ई-मेल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर प्राप्त झालेल्या लिंक्स किंवा फाइल्सवर कधीही क्लिक करू नका. हा संगणकाला मालवेअरने संक्रमित करण्याचा प्रयत्न असू शकतो.
 
तुमचे वेबकॅम झाकून ठेवा: जर हॅक झाले/खराब झाले तर (लॅपटॉपमध्ये डिफॉल्ट) वेबकॅम दैनंदिन क्रियाकलापांचे निरीक्षण/पाहण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी एक माध्यम म्हणून वापरता येतो. वापरात नसताना वेबकॅम झाकून ठेवण्याची शिफारस केली जाते.
 
सोशल मीडियावर योग्य गोपनीयता सेटिंग्ज आणि कंटेंट शेअरिंग फिल्टर निवडा जेणेकरून तुम्ही तुमची माहिती, फोटो आणि व्हिडिओ फक्त तुमच्या विश्वासू व्यक्तींसोबतच शेअर करू शकाल. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना निवडक राहा तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या व्यक्तीला कसे ब्लॉक करायचे ते शिका तुमच्या फ्रेंड लिस्टमधून एखाद्याला कसे काढून टाकायचे ते शिका वापरल्यानंतर सोशल मीडिया वेबसाइटवरून लॉगआउट करायला विसरू नका. आपल्या ऑनलाईन जगाचा वापर करताना सुरक्षितता वाळगा, सावधगिरी आणि सतर्कता आजच्या काळातील महत्वाची हत्यारे आहेत.