सिम स्वॅप फसवणूक

JSB Financial Blog    21-Dec-2019
|

sim swap_1  H x 
 
 
मोबाईलवरील सेवांमध्ये सुधारणा करणे, कनेक्टिव्हिटी दोष दूर करणे यासाठी स्मिशिंग किंवा विशिंगचा वापर करून फसवणूक करणारी व्यक्ती लक्ष्यित व्यक्तीकडून सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून वैयक्तिक माहिती, घराच्या पत्त्यासंदर्भातील कागदपत्रे, बँक खाते, डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड इ. तपशील गोळा करते... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘सिम स्वॅप फसवणूक’बद्दल माहिती देणारा हा पाचवा लेख...
…………………………………………………..
 
सिम स्वॅप म्हणजे काय, तर सिमकार्डची अदलाबदल करणे. एखाद्या व्यक्तीच्या सिमकार्डचा गैरवापर करून काही अपहार करायचा असेल तर संबंधित व्यक्तीचे सिमकार्ड मिळविणे आवश्यक असते. अशा वेळी फसवणूक करणारी व्यक्ती स्मिशिंग किंवा विशिंग अॅटॅकचा वापर करून लक्ष्यित व्यक्तीस संपर्क करते. (स्मिशिंग म्हणजे एसएमएसचा वापर करून किंवा विशिंग म्हणजे मोबाईलवर संपर्क करून माहिती मिळविणे ).
 
मोबाईलवरील सेवांमध्ये सुधारणा करणे, कनेक्टिव्हिटी दोष दूर करणे यासाठी स्मिशिंग किंवा विशिंगचा वापर करून फसवणूक करणारी व्यक्ती लक्ष्यित व्यक्तीस २० अंकी युनिक सिम क्रमांक कळविण्यास सांगते. त्यानंतर फसवणूक करणारी व्यक्ती, लक्ष्यित व्यक्तीकडून सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून वैयक्तिक माहिती, घराच्या पत्त्यासंदर्भातील कागदपत्रे, बँक खाते, डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड इ. तपशील गोळा करते. आवश्यक कागदपत्रे व माहिती गोळा केल्यानंतर फसवणूक करणारी व्यक्ती, मोबाईल कंपनीकडे बनावट (डुप्लिकेट) सिम मिळण्यासाठी अर्ज सादर करते.
 
नवीन सिम मिळाल्यावर फसवणूक करणारी व्यक्ती, लक्ष्यित व्यक्तीस कॉल करते आणि त्याला सांगते, की आपण मोबाइल कंपनीकडून कॉल करीत असून आपल्या मोबाईलवर सेवा सुधारण्यासाठी / कनेक्टीव्हिटीमधील दोष दूर करण्यासाठी आपला मोबाईल काही काळ बंद ठेवण्यास सांगते किंवा ‘एरोप्लेन मोड’वर ठेवण्यास सांगते. काही वेळा विविध स्किमची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सतत फोन करून लक्ष्यित व्यक्तीस हैराण केले जाते, जेणेकरून वैतागून अशी व्यक्ती आपला मोबाईल बंद करते. लक्ष्यित व्यक्तीचा मोबाईल बंद झाल्यावर फसविणारी व्यक्ती नवीन मिळालेले सिमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये घालते आणि मोबाईल कंपनीला नवीन कार्ड सुरू करण्याची विनंती करते. नवीन सिमकार्ड सुरू झाल्यानंतर मूळ मोबाईलधारकाला मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीस मिळतात. त्याचा फायदा घेऊन लक्ष्यित व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे अन्यत्र पाठविणे, यूपीआयचा वापर करून खरेदी करणे अशा प्रकारचे गुन्हे केले जातात. त्यासाठी लागणारी माहिती पूर्वीच मिळविलेली असते. मूळ मोबाईल धारकाची मोबाईल कनेक्टीव्हिटी बंद झाल्यामुळे त्याच्या खात्यावर झालेल्या व्यवहाराचे एसएमएस त्याला प्राप्त होत नाहीत. जेव्हा त्याला हे कळते, तोपर्यंत फसवणूक करणाऱ्याने बँक खात्यातील सर्व रक्कम काढलेली असते.
 
 

काय काळजी घ्यावी?

१. अज्ञात व्यक्तीशी आपली वैयक्तिक माहिती तसेच त्यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे शेअर करू नयेत.
२. डेबिट कार्डचा नंबर, कार्डची मुदत संपण्याचा दिनांक, कार्डच्या मागे असलेला तीन अंकी ‘सीव्हीव्ही’ क्रमांक कोणाशीही शेअर करू नये.
३. अनोळखी ठिकाणी कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढू नका.
४. अनोळखी व्यक्तीने एसएमएसद्वारे किंवा ई-मेलद्वारे पाठविलेल्या कोणत्याही लिंकद्वारे आपल्या वैयक्तिक माहिती संदर्भातील कागदपत्रांच्या प्रती शेअर करू नयेत.
५. कोणतीही बँक आपल्या खातेदाराला फोन करून त्याच्या डेबिट कार्डची माहिती विचारत नाही, त्यामुळे बँकेतून बोलत आहे असे सांगून कोणीही फोनवरून आपल्या कार्डसंदर्भातील माहिती विचारल्यास माहिती सांगू नये.
६. महत्त्वाच्या (आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा इ.) कागदपत्रांच्या झेरॉक्स काढताना खबरदारी घेऊन, समोर उपस्थित राहून काढून घ्या.
७. झेरॉक्स काढताना एखादी झेरॉक्स खराब आल्याचे निदर्शनास आल्यास दुकानदार ती कॉपी कचऱ्यात टाकतो. अशा वेळी सदर प्रत मागून घेऊन स्वतःकडे ठेवावी अथवा फाडून टाकावी.
८. मोबाईल कनेक्टिव्हिटी समस्येकडे दुर्लक्ष करू नये. अशी समस्या वारंवार येत असेल, तर संबंधित कंपनीशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
९. बँकेतील खात्यावर होणाऱ्या व्यवहारासंदर्भातील माहिती प्राप्त होण्यासाठी एसएमएस व ई-मेल अशा दोन्ही पर्यायांसाठी बँकेकडे नोंदणी करावी.