बँकांनी शेतकऱ्यांना विनाव्याज कर्जपुरवठा करावा

30 Aug 2016 16:27:00

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू तयार होण्यासाठी खेळाडूंसाठी बँकांनी क्रीडा कर्ज (स्पोर्ट लोन) ही संकल्पना राबवावी, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सधन असणार्या ठेवीदारांकडून बँकांनी विनाव्याज ठेवी घ्याव्यात आणि त्या रकमेतून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणार्याअ शेतकर्यांिना विनाव्याज कर्जपुरवठा करावा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे व्यक्त केले.

पुण्याच्या जनता सहकारी बँकेमध्ये इचलकरंजीच्या चौंडेश्वयरी सहकारी बँकेचा विलीनीकरण समारंभ इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात झाला. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुरेश हाळवणकर, सहकारतपस्वी बापूसाहेब पुजारी, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बिरंजे, सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, जनता बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंदराव खळदकर, उपाध्यक्ष श्री. संजय लेले, संचालक, ग्राहक आदी यावेळी उपस्थित होते. या समारंभात बँकेच्या ‘जेएसबी ईझी नेट’ या मोबाईल सेवेचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. पाटील म्हणाले, ठेवीदारांनी बँकेत ७ वर्षांच्या काळासाठी विनाव्याज ठेव ठेवली, तर त्या ठेवींमधून बँकांना शेतकरी वर्गासाठी कर्जपुरवठा करता येणे शक्य आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीतून बाहेर येणार आहे. या वेळी श्री. पाटील यांनी ५ लाखांची ठेव बँकेत ठेवत असल्याचे जाहीर केले. क्रीडापटूंना विविध क्रीडा प्रकारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी `स्पोर्ट लोन` योजना राबवली जावी, अशी सूचना त्यांनी केली.

सहकारावरील विश्वा स दृढ होण्यासाठी जनता बँकेने आगामी काळात आणखी काही बँकांचे विलीनीकरण करावे, असे स्पष्ट करून श्री. देशमुख म्हणाले, मुद्रा बँक योजनेतून जनता बँकेने इचलकरंजीतील व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, त्याचप्रमाणे रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेता वस्त्रोद्योग व्यवसायाला मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बँकेचे अध्यक्ष श्री. खळदकर म्हणाले की, सहकारी बँक विलीन करून घेण्याचा पायंडा जनता बँकेने घातला आहे, त्यामुळे बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. बँकेचे सहमहाव्यवस्थापक श्री. दिलीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. श्रीधर विसाळ यांनी आभार मानले आणि श्री. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Powered By Sangraha 9.0